जळगाव, (प्रतिनिधी) : संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी संध्याकाळी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला, तरुण व शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षवेधी होती. ढोलताश्यांच्या गजरात भाविकांनी जल्लोष करीत आपला उत्साह दाखविला.
जगतगुरु संत रोहीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त चर्मकार बहुद्देशीय संस्थातर्फे सुरुवातीला बुधवारी सकाळी समाज मंदिरात संत रोहिदास यांच्या पुतळ्याला संस्थेचे अध्यक्ष किशोर धोरे यांनी पूजन करीत माल्यार्पण केले. यावेळी समाज बांधवांनी त्यांच्या कार्याचे स्मरण केले. तसेच महाआरती करण्यात आली. यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती देत संत रोहिदास महाराजांचे दर्शन घेतले.
यानंतर संध्याकाळी रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून संत रोहिदास महाराज यांची प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली. शोभा यात्रेच्या सुरुवातीला संत रोहिदास महाराजांची मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अध्यक्ष किशोर धोरे म्हणाले की, संत रोहिदास महाराज परिश्रम घेऊन अत्यंत समर्पितपणे आपले कार्य करीत असत. ज्या कोणालाही मदतीची गरज भासली, तेव्हा संत रोहिदास त्यांच्या मदतीला धावत. जर आपले मन शुद्ध असेल तर देव आपल्या अंत: करणात वास करतो, असे ते सांगायचे, असे सांगत किशोर धोरे यांनी जीवनकार्याविषयी माहिती सांगितली. ही मिरवणूक नेहरू चौक, शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे विसनजी नगरातील संत गाडगेबाबा यांच्या उद्यानात समाप्त झाली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष विजय खजूरे, सचिव दीपक मेथे, खजिनदार विजय अहिरे, महिला सदस्य लताबाई धोरे, नीलिमा धोरे, रेखाबाई अहिरे, सदस्य रविंद्र धोरे, महेंद्र मेथे, लखन झिरे, साहेबराव खजुरे, कैलास मेथे, छोटू धोरे, किशोर हिरे, भाईदास कासवे, राजू धोरे, विक्रम हिरे, भरत बेरभैय्या, सागर बेहेरे, दिलीप जिरे, पंडित धोरे, संतोष धोरे, सुनील वाघ, अनिल चंद्रे, अशोक बेरभैया, परमेश्वर अहिरे आदी उपस्थित होते. प्रेमराज शिंपी आदींनी मिरवणुकीत सहभाग घेऊन परिश्रम घेतले.