जळगाव, (प्रतिनिधी) : अजिंठा फिल्म सोसायटी देवगिरी चित्र साधना द्वारा आयोजित चौथा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल दिनांक ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी जळगावात छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे संपन्न होत आहे. या संदर्भात गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली
चित्रपट विषयक प्रदर्शनी, शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग, मास्टर क्लास, चर्चासत्र, ओपन फोरम, टुरिंग टॉकीज तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांसह उद्घाटन व समापन सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे. यंदा या महोत्सवाचे ४ थे वर्ष असून खान्देश व मराठवाडा क्षेत्रासह संपूर्ण राज्यातून या महोत्सवासाठी १०० हून अधिक शॉर्टफिल्म सहभागी झाल्या आहेत. तज्ञ परिक्षकांमार्फत परिक्षण करुन यातील निवडक ७२ शॉर्ट फिल्मचे अधिकृत प्रदर्शन या दोन दिवसीय महोत्सवात करण्यात येणार आहे.
अभिनेते गिरीश कुलकर्णी, उद्योजक अशोक जैन, आ. राजुमामा भोळे, देवगिरी प्रांत सहकार्यवाह स्वानंद झारे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नत्रवरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न होईल. शो मॅन स्व. राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष कार्यक्रम यावेळी सादर करण्यात येईल. यावेळी अभिनेता गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक नितिन भास्कर यांना अत्यंत मानाचा यावर्षीचा देवगिरी चित्र गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
सायंकाळी ७ वा. दुरींग टाकीज या सत्रात भारतीय चित्रपटांचा सुवर्ण काळ दर्शवणारा व जुन्या आठवणींना उजाळा देणारा श्री ४२० हा चित्रपट एम्फी थिएटर, भाऊंचे उद्यान येथे प्रदर्शित करण्यात येईल. तसेच चित्रपट रसिकांशी खुला संवाद कार्यक्रम होणार आहे.
दि.०९ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दोन्ही सभागृहात फिल्म स्क्रिनींग होईल. स. ११ वा. चित्रपट रसग्रहण या विषयावर दिग्दर्शक मिलिंद लेले पुणे यांचा मास्टर क्लास होईल. एम.जी.एम. विद्यापीठ फिल्म मेकिंग विभागाचे प्रमुख प्रा. शिवदर्शन कदम ग्रामीण भागातील युवकांना चित्रपटातील संधी व प्रशिक्षण या विषयांवर युवा फिल्म मेकर्स साठी मास्टर क्लास होईल. तथा दुपार सत्रात होणाऱ्या ओपन फोरम सत्रात ‘योफिमा’ शिष्यवृत्ती विजेते युवा चित्रकर्मी सह सुप्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कराडे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, दिग्दर्शक भाऊराव कराडे, डॉ. भरत अमळकर, प्रकाश चौबे, अॅड. किशोर पाटील, सतिश मदाने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म, कॅम्पस फिल्म, माहितीपट यांना सामुहिक तसेच वैयक्तिक पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. हा संपूर्ण महोत्सव सर्व नागरिक, रसिक श्रोते तथा चित्रपट क्षेत्रात करियर करु इच्छित तरुणांसाठी पुर्णपणे मोफत असणार आहे. या दोन दिवसीय महोत्सवाचा जळगावकर नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जयंत शेवतेकर, उपाध्यक्ष अनिल भोळे, सचिव विनीत जोशी, कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, सहसचिव सुचित्रा लोंढे, आयोजन समितीचे प्रमुख डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, पंकज सोनवणे तथा चित्रसाधना प्रांत संयोजक किरण सोहळे यांनी केले आहे.