जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांचे आचरण करणे होय. संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य स्थापन करायचे आहे. संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिकांनी कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही, असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी केले.
येथील विवेकानंद नगर येथे शक्ती फाऊंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने संविधान गौरव अभियान अंतर्गत सामूहिक संविधान उद्देशिका वाचन तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन भेट वस्तू देण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शहराचे आ. राजूमामा भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, माजी महापौर सीमा भोळे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी-कोल्हे, गोपाल दर्जी, प्रभागाच्या माजी नगरसेविका सिंधु कोल्हे, लीना पवार, शिवसेनेच्या शोभा चौधरी, शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष भारती रंधे, निशा पवार, ममता जंजाळे व सुषमा चौधरी आदी उपस्थित होते.