जळगाव, (जिमाका) : जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून यात १२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान अपघात घडल्याची माहिती मिळताच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिता वाघ ह्या काही वेळातच परधाडे येथे पोहचून परिस्थिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हेही घटना स्थळी थांबून होते.
मयत झालेल्यांना जळगाव शासकीय रुग्णालयात पाठवून. जखमी झालेल्यांना पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या दोन्ही हॉस्पिटल मध्ये भेटून जखमी व्यक्तींची चौकशी करून त्यांना धीर दिला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी त्यांच्या समवेत होते.