जळगाव, दि. 02 – संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन तर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन जळगावात करण्यात आले आहे. बासरीच्या सुरांनी दिवाळी पहाट दि ४ नोव्हेंबर, गुरूवारी पहाटे ६:३०वा साजरी करण्यात येणार आहे. दिवाळी हा आनंदाचा, उत्सवाचा सण असतो, संगीत व सुरांनी आपण आपलं आयुष्य समृद्ध करावं यासाठी परिवर्तन दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन नरकचतुर्दशीच्या दिवशी करत असते.
यावर्षी पं.विवेक सोनार यांचे शिष्य योगेश पाटील यांचे बासरी वादन होणार आहे. खान्देशासह महाराष्ट्रभर त्यांनी बासरी वादनाचे कार्यक्रम केले असून उत्तम बासरी वादक कलावंत म्हणून परिचित आहेत. त्यांना तबल्यावर पं.रामदास पळसुले यांचे शिष्य श्रीपाद शिरवळकर (पुणे) हे साथसंगत करणार आहेत. किबोर्डवर शिवम चक्रवर्ती, रविंद्र कांबले यांचे शिष्य सागर सपकाळे, तानपुऱ्यावर कल्याणी मोराणकर व बासरी सहाय्यक किर्तेश बाविस्कर हे कलावंत सहभागी होणार आहेत.
या मैफिलीचे निवेदन व संचालन रंगकर्मी मंजुषा भिडे करणार आहेत. दिवाळी पहाट कार्यक्रम दि. ४ नोव्हेंबर २०२१, गुरुवारी, पहाटे ६:३० वा. भाऊंच्या उद्यानातील अॅम्फी थिएटर येथे होणार आहे. भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशनचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे. रसिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी केले आहे.