जळगाव | खानदेश प्रभात वृत्तसेवा | अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघप्रणीत बहिणाई ब्रिगेड संघातर्फे शुक्रवारी महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते समाजातील दहा कवींना कविरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम शहरातील बहिणाबाई चौधरी उद्यानात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बहिणाबाई चौधरींच्या स्मृतींना उजाळा म्हणून काही कवींनी त्यांची गाणी गायिली. तसेच महापौर जयश्री महाजन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि जळगाव यांच्यातील नाते उपस्थितांसमोर विशद केले. त्यानंतर महापौर यांच्या हस्ते तुषार वाघुळदे, के. के. भोळे, ए.के.नारखेडे, प्रा.डॉ.संध्या महाजन, सुनीता येवले, प्रा.डॉ.प्रकाश महाजन, मनीषा चौधरी, सविता भोळे, ज्योती राणे -पाटील, शीतल पाटील याांना कविरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा व माजी महापौर श्रीमती आशा कोल्हे, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंडू भोळे, प्रदेश उपाध्यक्षा हर्षा बोरोले, जिल्हाध्यक्षा सुनीता येवले, महानगराध्यक्षा श्रीमती साधना लोखंडे नगरसेविका मीनाक्षी पाटील, श्रीमती रजनी महाजन, श्रीमती अंजली चौधरी यांच्यासह कार्यकारिणीतील सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.