भाविकांच्या उत्साहात लागला शिव-पार्वती विवाह, रात्री कीर्तनालाही प्रतिसाद
जळगाव, (प्रतिनिधी) : मानवात केवळ भोग वृत्ती नको पाहिजे. पोट भरेल एवढं कमवा, मात्र त्याचे पाठीवर ओझे होईल एवढेही कमवू नये. या दोन्ही वृत्तीला दानाने कमी करता येते. त्यामुळे दान, धर्म करा. देव-देव करताना त्यात प्रपंच आणू नये. आई – वडील यांचे चार पाय म्हणजे चार धाम आहेत. म्हणून त्यांची जीवंतपणी सेवा करा, असा संदेश बीड येथील भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांनी दिला.
येथील जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे दि. १५ ते २२ जानेवारीपर्यंत जुने जळगाव येथील बदाम गल्लीत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील विविध कीर्तनकार त्यांच्या सुश्राव्यवाणीतून कीर्तन करीत आहेत. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती करण्यात आली.
तिसऱ्या दिवशी भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी म्हणाले की, मानवाने अहंकार, गर्व करू नये. कारण या जगात कोणीच कोणाचा नाही. आयुष्य संपल्यावर पैसा, संपत्ती, जमीन जुमला सोबत येत नाही. जेव्हा मृत्यू जवळ येईल त्यावेळेस फक्त नातेवाईक आपल्याला भेटायला येतील. मात्र सोबत कोणीच येणार नाही. जो आपल्यासोबत शेवटपर्यंत येईल त्याच्यासोबत आपले नाते जुळण्यासाठी परमेश्वराशी कायम स्मरण करा, असेही त्यांनी सांगितले.
तसेच त्यांनी शिव कथेचे संक्षिप्त वर्णन केले. यावेळी महादेव-पार्वती यांचा विवाह सोहळ्याचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. या लग्नात भगवान ब्रम्हा, विष्णू यांच्यासह शिव शंकराचे भक्त भाविक वऱ्हाडीमध्ये नाचत होते. कथेनंतर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, डॉ. जितेंद्र चौधरी, माजी नगरसेवक अमित काळे, आयएमएचे डॉ. स्नेहल फेगडे, चंद्रकांत माळी या मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आला. रात्री ८ वाजता हभप महामंडलेश्वर माधवानंद सरस्वती महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.
कथेत धरणगाव येथील माऊली वारकरी विद्यार्थी संस्थेचे भजनी मंडळ होते. तर गायनाचार्य मयूर महाराज, तरवाडे व ईश्वर महाराज, हतनूर मृदुंगाचार्य मयूर महाराज, खाक्रुंडी यांनी काम पाहिले. भाविकांनी दररोज कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.