पुणे, (प्रतिनिधी) : देशात ‘हर घर संविधान’ मोहीम निघते, हे चांगले आहे. मात्र या संविधानाची माहिती घराघरात करून देणे व त्यातील तरतुदींवर कृतीशील राज्यकारभार चालणे महत्वाचे आहे. देशातील अनेक ठिकाणी संविधानविरोधी वक्तव्ये करून देशात तणाव निर्माण करण्याचे काम केले जात आहे. मात्र, संविधान हा जीवन जगण्याचा मार्ग असून संविधानाची मूल्ये जगण्याचा आधार बनली पाहिजेत,असे प्रतिपादन अहमदाबाद येथील संविधान अभ्यासक मार्टिन मकवाना यांनी केले.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३५ वर्षपूर्तीनिमित्त संविधान जागर राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संतभूमीतील आळंदी येथील मुंबई मराठा फ्रुट मार्केटमध्ये करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिसचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील होते. मंचावर बेंगलुरु येथील प्रा. खलील अन्सारी,अभिनेता निखिल चव्हाण, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे,राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, नंदकिशोर तळाशिलकर, डॉ. ठकसेन गोराणे, गजेंद्र सुरकार, सुधिर निंबाळकर आदी उपस्थित होते.
मकवाना पुढें म्हणाले की, डॉ.आंबेडकरांनी समाजाचे आजारपण शोधून त्यावर निदान करण्याचे काम भारतीय संविधानाच्या औषधोपचाराने केले. समाजातील विविध घटकांचा अभ्यास करून सर्वसमावेशक तरतुदी संविधानात नमूद केल्या. यामुळे सर्व घटकांना समान न्याय मिळाला. संविधानाची सुरुवात प्रत्येक नागरिकापासून होते. मी काय आहे, कोण आहे हे ओळखून प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली तर संविधान निर्मिती यशस्वी होऊ शकते, असे मकवाना म्हणाले.
निखील चव्हाण यांनी, संत समाजसुधारकांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.निसर्ग हा मोठा देव असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात अविनाश पाटील म्हणाले, ज्या संघटना संविधानाच्या अधीन राहून काम करतात, त्यांना संपविण्याचे राजकारण सुरु आहे. मात्र आता समविचारी संघटनांना सोबत घेऊन संविधान लोकांच्या मनात पोचविण्याचे काम केले जाईल. संविधान हा स्वतंत्र विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
ऍड.गोविंद पाटील यांनी प्रास्ताविकातून अंनिसच्या ३५ वर्षाची वाटचाल सांगितली तर कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी ३५ वर्षात अंनिसच्या महत्वाच्या कार्यक्रम,उपक्रमांवर प्रकाशझोत टाकला. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी केले तर आभार पुणे येथील एकनाथ पाठक यांनी मानले. परिषदेला राज्यभरातून १ हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
परिसंवादात वैचारिक मांडणी..
राष्ट्रीय परिषदेत संविधानाची ७५ वर्षे : उपलब्धी आणि आत्मपरीक्षण या विषयावर आयोजित परिसंवादात प्रमुख वक्ते प्रा.नितीश नवसागरे यांनी, आपण संविधानाची ७५ वर्षे गाठली. ही मोठी उपलब्धता असून संविधानामुळे देशाची विविध क्षेत्रात प्रगती आहे पण देशात आजही जातीयता, धर्मांधता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, कुपोषण, भ्रष्टाचार अशी विविध आव्हाने असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी, संसदीय मार्गाने संविधानाची पायमल्ली होत असून सर्व सामाजिक संघटनांनी संसदेबाहेरची लढाई लढली पाहिजे. मशीन बिघडू द्या,आपण मेंदू घडवूया’ असा मंत्र आत्मसात करून संघटनांनी भविष्यात वाटचाल केली पाहिजे. असे ते म्हणाले.
अध्यक्षीय मनोगतात मानवाधिकार कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांनी सांगितले की, सरकारकडून कायदेशीर शास्तीकरण करून लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असून लोकशाही मूल्य जपण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. दुसऱ्या परिसंवादात “संविधानाच्या स्वप्नातील भारत आणि नवनिर्माणाच्या दिशा” या विषयावर प्रा.खालीद अंसारी व संविधान अभ्यासक ऍड. विंदा महाजन यांनी विषयाची मांडणी केली. समारोप सत्रात प्रा. सुभाष वारे यांनी संविधानाबद्दल वैचारिक चर्चा केली तर संजय बनसोडे यांनी संविधानासाठी जनमानसात रुजवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन केले.