किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शहापूर शिवारातील मार्गशीर्ष महिन्यात श्रीदत्त जयंती पासून ढोल ताशांंच्या गजरात तुळसाबाई यात्रोला अर्थात शेंगोळा यात्रेस सुरुवात झाली आहे. तुळसाबाई मंदिराजवळच सादिलशा बाबांचा दर्गा आहे. त्यामुळे शेंगोळा यात्रेत हिंदू बांधवांबरोबरच मुस्लिम बांधवही मोठ्या संख्येने याठिकाणी दरवर्षी येतात.
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणूनही ही यात्रा ओळखली जाते. दानशूर मोहनगीर गोसावी यांनी संस्थानला चार एकर शेती दान दिली आहे. तसेच माजी आमदार कै.आबाजी नाना पाटील यांनी मोेठे आर्थिक सहकार्य केले आहे. १५ दिवस चालणार्या या यात्रोत्सवात सिनेमा, तमाशे, लोकनाट्य, आकाश पाळणे, खेळणी, मिठाईची, भांड्यांची दुकाने थाटली आहेत. या यात्रेत रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. भाविकांच्या सुरक्षेसाठी जामनेर पोलीस, शहापूर ग्रामपंचायत यांचे नियंत्रण असते.
संत गाडगे महाराज यांनी शेंगोळा फाट्यावर दत्त जयंतीला तुळसाबाईचे रोप लावून पंचक्रोशीतील गावकऱ्यांचे कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केल्याचे जाणकार सांगतात. तेव्हापासून या परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून या यात्रेला शेंगोळा यात्रा संबोधले जाते. तेव्हापासून येथे यात्रा भरत असल्याचा इतिहास जुने जाणते सांगतात दत्त पौर्णिमे पासून सुरु झालेली यात्रा पंधरा दिवस चालते.