जळगाव, (प्रतिनिधी) : मुस्लिम सेवाभावी संस्था आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेणाऱ्या समाज बांधवांना अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी शासनाने आमंत्रित करावे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाला बुधवारी निवेदन देण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक महानगर युवा मोर्चाचे महानगराध्यक्ष अशफाक मुनाफ काटीक यांच्या नेतृत्वात अल्पसंख्याक दिनानिमित्त प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी सरचिटणीस जावेद सलिम खाटीक, सरचिटणीस मोसीन शाह, चिटणीस शाहीद मजीद शेख, शाकीर शेख, जाकीर पठाण, इमरान कुरेशी, वसीम कुरेशी, नईन सैय्यद, सलीम गुलाम अली यांची उपस्थिती होती.
सध्याच्या काळात विशेषतः पोलिस खाते, शिक्षण विभाग, महसूल विभाग, राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समाज संख्याच्या तुलनेत सर्वाधिक मागासलेला आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाला समाजाच्या प्रगतीसाठी पुढे नेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज असल्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.