भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी
जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दरोडा आणि मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या ७ जणांना शिताफीने अटक केली आहे. संशयितांकडून २ गावठी कट्टे, ४ काडतूस, ४ चाकू, ४ तलवारी, १ फायटर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली.
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना भुसावळ-नागपुर हायवे लगत असलेल्या अलिशान वॉटर पार्कच्या मागील बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत बंदूक आणि घातक हत्यारांसह गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत ७-८ लोक उभे असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी लागलीच अधिकारी तसेच गुन्हे शोध पथकाला कार्यवाही करण्यासाठी रवाना केले.
त्याठिकाणी ७ इसम हे संशयीतरित्या उभे असल्याचे दिसुन आले. पथकाची खात्री होताच त्यांनी सातही इसम यांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता २ गावठी कट्टे, ४ काडतूस, ४ चाकू, ४ तलवारी, १ फायटर असा मुद्देमाल अंगझडतीत मिळुन आला. पोलिसांनी इम्रान शेख उर्फ मॉडेल रसूल शेख (रा.भारत नगर, भुसावळ), अरबाज शेख शबीर (रा.तेली गल्ली, भुसावळ), मुजम्मिल शेख मुज्जू शेख हकाम (रा.फैजपूर), शोएब इकबाल खाटीक (रा.फैजपूर), आदित्य सिंग उर्फ विक्की अजय ठाकूर (रा.खंडवा), राहुल उर्फ चिकूराम डेंडवाल (रा.खंडवा), मोहित जितेंद्र मेलावंस (रा.खंडवा) यांचेवर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, हवालदार महेश चौधरी, सोपान पाटील, प्रशांत सोनार, भुषण चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, राहुल वानखेडे अशांनी केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.