जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मेहरुण भागात महादेव मंदिराजवळ संशयीत इसमांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि गांजा असा १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी रविवार दि.२७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना मेहरूण परिसरातील महादेव मंदिराजवळ दोन तरुण संशयास्पद स्थितीत आढळून आले. त्यांची झडती घेतली असता एकाच्या कमरेला गावठी पिस्तूल व त्यात मॅक्झिनमध्ये दोन जिवंत काडतूस आढळून आले. याशिवाय गांजा पिण्यासाठी लागणारी चिलम आणि एक ग्रॅम गांजा देखील आढळून आला.
यामुळे पोलिसांनी संशयित आरोपी साहिल मोहम्मद तडवी (वय २२, रा. मच्छी बाजार, तांबापुरा, जळगाव) याला ताब्यात घेतले तर त्याच्यासोबत असणारा दीपक शांताराम रेणुके (वय २१ रा. तांबापुरा,जळगाव) याची देखील चौकशी करण्यात येऊन ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी १५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल तसेच मॅक्झिनमधील २ जिवंत काडतूस याशिवाय १०० रुपये किमतीचा १ ग्रॅम वजनाचा गांजा व त्यासाठी लागणारे चिलम असा एकूण १६ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून साहिल मोहम्मद तडवी, दीपक रेणुके याला अटक करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर, गणेश ठाकरे, चंद्रकांत पाटील, बागवान अशांनी केली आहे.