जळगाव, (प्रतिनिधी) : शेत जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्याच्या मोबदल्यात एकूण १ हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई पारोळा तालुक्यातील लोणी येथे झाली.
लोणी गावातील ३९ वर्षीय तक्रारदार यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे लोणी बु. ता.पारोळा येथे साडे सहा एकर शेत जमीन आहे. सदर शेत जमिनीवर तक्रारदार यांना लोणी बु. गावातील वि. का.सो. सहकारी सोसायटीमधुन कर्ज घेण्यासाठी सदर शेत जमिनीचे ७/१२ उताऱ्यावर बोजा चढविणे आवश्यक होते. त्यामुळे तक्रारदार यांनी लोणी बु. गावाचे तलाठी संशयित आरोपी सुभाष विठ्ठल वाघमारे (वय ३४ वर्षे, ह.मु. बोहरा स्कूलजवळ, वर्धमान नगर, पारोळा) याची चोरवड येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर नमुद कामा संदर्भात तलाठी यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान तलाठी यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुमच्या व कुटुंबियांच्या नावे असलेल्या शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्याच्या मोबदल्यात ४ उताऱ्याचे प्रत्येकी २००/-प्रमाणे ८००/-रुपये व मागील कामाचे २०० असे एकुण १०००/- रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यावेळी संशयित आरोपी खाजगी इसम शरद प्रल्हाद कोळी (वय ४३ वर्षे, रा.चोरवड ता. पारोळा) याने सदर लाच मागणीस प्रोत्साहन देऊन लाच रक्कम त्यांच्या फोन पे अकाउंट वर टाकण्यास सांगुन लाच रक्कम मिळविण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला म्हणून त्यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे लाच मागणीबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सदर कारवाई हि पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, निरीक्षक स्मिता नवघरे, पोहेको शैला धनगर, पोकॉ/प्रदिप पोळ, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ,रविंद्र घुगे, सुनिल वानखेडे, पोना बाळू मराठे, पोना किशोर महाजन, पोकॉ प्रणेश ठाकुर, पोकॉअमोल सुर्यवंशी यांनी केली आहे.