औरंगाबाद, दि. 25 – वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारी आणि डॉक्टरांच्या पाठीशी खंबीरपणे असणाऱ्या ‘आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन’ तर्फे औरंगाबाद शहरात येत्या 27 सप्टेंबर रोजी सोमवारी राष्ट्रीय पातळीवरील आयमा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे , अशी माहिती असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते तुषार वाघुळदे यांनी दिली. आयुष ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. आयुर्वेदिक, अँक्यूपंक्चर, युनानी, योगा, नॅचरोपॅथी, सिद्ध आणि होमिओपॅथी या सात पॅथी एकाच छताखाली या संघटनेने एकत्र आणलेल्या आहेत. ही संघटना केंद्र सरकारसोबतही कार्य करीत असल्याचे वाघुळदे यांनी सांगितले.
संघटनेचे अध्यक्ष डॉ.सतीश कराळे ( नागपूर ) हे असून उपाध्यक्ष डॉ. नितीन राजे पाटील ( बुलडाणा ) तर सेक्रेटरी डॉ. मनोज शर्मा ( कोटा , राजस्थान ) हे आहेत. या सर्व पॅथीचे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना ज्या अडीअडचणी, समस्या येतात त्या दूर करण्याचे तसेच डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ही संघटना सक्षमपणे उभी राहत असते.
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन ही वैद्यकीय क्षेत्रातील महत्वपूर्ण संघटना असून ” रिसर्च आणि डेव्हलपमेंट ” मध्येही कार्य करीत आहे. आधुनिक काळात आलेले नवनवे तंत्रज्ञान , संशोधन आदींबाबत संघटनेतर्फे स्वतंत्र सेमिनार तसेच कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे डॉक्टरांना प्रोत्साहन देणे , त्यांच्या भरीव कार्याचे तसेच कोरोनाच्या काळात अविस्मरणीय कामगिरी आयुषच्या डॉक्टरांनी केली आहे. त्यांचे कौतुक व्हावे यासाठी या देखण्या ‘आयमा फेस्टिव्हल’ चे औरंगाबाद येथील पैठण गेट जवळील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे. यात ‘आयमा रत्न’ विजेत्यांना आकर्षक मोमेंटो , सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
दरम्यान कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल विभागाचे उपसचिव शामसुंदर पाटील, आमदार सुभाष झांबड, महापालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय तसेच सर्व पॅथीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची खास उपस्थिती राहणार आहे. विविध राज्यातून डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते तुषार वाघुळदे यांनी पत्रकार परिषदेेत दिली.