तीन जणांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल
यावल | दि. ०७ ऑगस्ट २०२४ | 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आठवडे बाजारात गेल्यानंतर तिला आंबापाणी येथील तिघांनी जबरदस्तीने दुचाकीव्दारे उचलून नेत आंबापाणी येथे एका झोपडीत दोन दिवस कोंडून ठेवत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल शहरातील बोरावल गेट भागातील 14 वर्षे अल्पवयीन मुलगी ही 26 जुलै रोजी दुपारी चार वाजता शहरातील आठवडे बाजारात आली व ती येथील एचपी पेट्रोल पंपासमोर उभी असताना तिला बोचर्या मुन्ना पावरा व त्याच्यासोबत असलेली एक महिला आणि एक मुलगा यांनी जबरदस्तीने मोटरसायकलीवर बसवून आंबापाणी पाड्यावर घेऊन गेले व तिथे दोन दिवस तिला एका झोपडीत कोंडून ठेवत तिचा विनयभंग केला.
या घटनेनंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तेथून आणत कुटुंबाच्या स्वाधीन केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.