हेमंत पाटील | सुनील आराक | जळगाव, दि.13 – गणरायाच्या आगमना नंतर दोन दिवसांनी गौराईचे आगमन होते. यावेळी घराघरांमध्ये भक्तीमय वातावरणात गौराई चे स्वागत करण्यात येते. दरम्यान आकर्षक सजावट करून गौरीची स्थापना केली जाते. विषेशतः महिला वर्गात यावेळी उत्सवाचे व आनंदाचे वातावरण असते. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात गौराईचे मनोभावे पूजन करण्यात येऊन आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येते.
भुसावळ शहरातील अनिल मधुकर कुलकर्णी यांच्या कडे गौरी गणपतीचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींची चौरंगावर स्थापना करण्यात आली असून सुंदर सजावट करण्यात आली आहे. दरम्यान सोळा भाज्या व पंचपक्वांन्नाचा नैवेद्य गौराईला दाखविण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या या गौराई उत्सवासंदर्भात अनघा कुलकर्णी यांनी माहिती दिली.
त्याचप्रमाणे जळगावातील व्यवसायिक प्रकाश मुळे यांच्या घरी देखील गौराईचे उत्साहात आगमन झाले. दरम्यान मुळे परिवाराच्या वतीने गौराईसाठी आकर्षक अशी सजावट करण्यात आली. दरम्यान याप्रसंगी मनोभावे पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी गोड पदार्थांचा नैवेद्य गौराईला देण्यात आला.
तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात घरात आनंद उत्सहाचे वातावरण असते, आमच्या सासूबाईंकडे असलेल्या गौराई आता आमच्याकडे आल्या असून, आम्ही ही परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली असल्याचे वनिता मुळे यांनी सांगितले. महालक्ष्मी ने दिलेला वसा माझ्या सूना, मुलं कधीच टाकणार नाही असा विश्वास प्रकाश मुळे यांच्या आई कुसुम मुळे यांनी व्यक्त केला.
पहा व्हिडिओ