भुसावळ, दि.२२ – अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या व्यक्तीस शहारातील नाहाटा चौफुली जवळील पाण्याच्या टाकीजवळून भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस हस्तगत हसतगत करण्यात आले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की संबंधित इसम नाहाटा चौफुली जवळ मोटर सायकल वर बसला असून त्याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याचा संशय आहे. तरी हा इसम कट्टा घेवुन कोणता तरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे. त्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीची खात्री करून त्यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलिस हेड कॉस्टेबल सुरज पाटील व पोलिस नाईक संकेत झांबरे यांना संबंधित इसमा ला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.
संशयीत इसम हा संशयास्पद हालचाली करीत असतांना मिळुन आल्याने पथकाने त्यास ताब्यात घेवुन त्याची अंग झडती घेतली असता त्याचे कडे एक गावठी कट्टा ( पिस्टल) मॅगझीन असलेला तसेच त्या मॅगझीन मध्ये दोन जिवंत काडतुस असे मिळुन आले. ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव प्रकाश सुभाष धुंदे, रा. नाडगांव, ता. बोदवड असे सांगितले. त्यास अधिक विचारपुस केल्यानंतर त्याने सदर गावठी कट्टा व काडतुसे हे तौसिफ असलम तडवी, रा. अयान कॉलनी, भुसावळ याच्या कडून विकत घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिस पथकाने तौसिफ तडवी याला देखील ताब्यात घेतले.
सदरची कारावई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ भाग कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोहेकॉ सुरज पाटील, संकेत झांबरे यांनी केली असून या बाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गु.र.नं. ५११/२०२३ आर्म अॅक्ट ३/२५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोहेकॉ महेश चौधरी हे करीत आहे.