जळगाव, दि.१९ – जिल्ह्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत जळगाव महानगरपालिका, सर्व नगरपरिषद, नगरपंचायती यांनी जमा केलेले ‘अमृत कलश’ गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वाजत-गाजत मिरवणूक काढत जमा करण्यात आले. हे सर्व अमृत कलश एकत्र करून जिल्ह्यातील एक कलश २६ ऑक्टोंबर रोजी मुंबई व दिल्ली येथे पाठविले जाणार आहेत. एकत्रित केलेल्या ‘अमृत कलशाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरपालिका प्रशासन सहायक आयुक्त जनार्दन पवार यांनी स्वागत केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशात भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या टॅगलाइनसह ‘मेरी माटी मेरा देश अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात सर्वत्र अमृत कलश यात्रा काढण्यात आल्या. ज्या कुटुंबांकडे शेती आहे अशा कुटुंबांतील सदस्यांकडून माती व ज्या कुटुंबांकडे शेती नाही अशा कुटुंबातील सदस्यांकडून एक चिमूटभर तांदूळ मातीच्या कलशात जमा करण्यात आले.
तसेच सर्व नगरपरिषद यांनी शिलाफलकम समर्पण – वीरांच्या नामफलकाची स्थापना, पंचप्राण प्रतिज्ञा घेणे, वसुधा वंदन देशी झाडांच्या ७५ रोपांसह अमृत वाटिकेची निर्मिती, वीरों का वंदन – देशाचे आणि शूरांच्या कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक / वीरांचा सन्मान राष्ट्रध्वज फडकवणे आणि राष्ट्रगीत गायन असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिट्टी को नमन, वीरों का वंदन हा सोहळा संपन्न होऊन देशभरातून जमा करण्यात आलेल्या मातीतून राजधानी दिल्ली येथे अमृत वाटिका व वॉर मेमोरिअल तयार करण्यात येणार आहे.