जळगाव, दि. ०१ – शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लागणे अत्यंत महत्वाचे असून नुकताच शहराच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत भरीव निधी देण्यात आला आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी विकास कामे सुरु आहेत. त्यातचं आता आणखी ५ कोटी निधी मंजूर झालायं.
शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आमदार सुरेश भोळे (राजुमामा) नेहमी प्रयत्नशील असून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. शहराच्या विकासात भर पाडण्यासाठी आज पुन्हा आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या मागणीवरून जळगाव शहरातील दलित वस्तीतील रस्त्यांच्या विकासकामांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पत्रकाद्वारे कळविण्यात आली.
यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्याचबरोबर जळगाव शहरासाठी भरीव निधी दिल्याबद्दल आमदार भोळे यांनी शहर वासीयांच्या वतीने सामाजिक न्याय विभागासह राज्य शासनाचे आभार मानले.