जळगाव, दि.११ – महात्मा गांधींनी आपल्या जीवनात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी कार्य केले व तेच काम गांधी रिसर्च फाउंडेशनने गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने काढलेल्या ग्राम संवाद सायकल यात्रेने केले आहे. सायकल यात्रा हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून यात्रेच्या संपर्कात येणाऱ्या व सहभागी असणाऱ्या सर्वांसाठी ती लाभदायक आहे. अशा प्रकारच्या उपक्रमाची संख्या वाढली पाहिजे असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील यांनी केले. ग्राम संवाद सायकल यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते अब्दुलभाई, प्रा. डॉ. अश्विन झाला व यात्रा समन्वयक गिरीश कुलकर्णी उपस्थितीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात अरमान आंगरा यांच्या प्रार्थना व भजनाने झाली. त्यानंतर सायकल यात्रेचे सादरीकरण करण्यात आले. सायकल यात्रेत सुरेश पाटील, विश्वजीत पाटील, श्रीराम खलसे, मारिया सिसिलिया, विशाल टेकावडे, आकाश थिटे, सुभाष कासदेकर, अमनकुमार वर्मा, काळूभाई मायडा, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी, विक्रम अस्वार, भिका पाटील, धनराज पाटील, वाल्मिक सैंदाणे यांचा सहभाग होता.
खान्देशी लोकांचे प्रेम, येथील संस्कृती, आदरातिथ्य व खाद्य पदार्थ यांनी आम्हास आनंद दिल्याचेही त्यांनी म्हटले. व्यसनाधीनतेची वाढती समस्या तसेच शाळांमधील शिक्षण व स्वच्छता याबाबत विशेष कार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अब्दुलभाई यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व सहभागींना मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तिपत्रके देण्यात आली. डॉ. निर्मला झाला यांनी आभार मानले. गिरीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, नितीन चोपडा, संतोष भिंताडे, हेमंत बेलसरे, चंद्रशेखर पाटील, अशोक चौधरी, तुषार बुंदे, योगेश संधानशीवे यांची उपस्थिती होती.