अमळनेर, दि. १० – तालुक्यातील आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मागील वर्षी राज्यशासनाने पाडळसरे धरणास भरीव 135 कोटी निधी देऊन कामास गती दिली असताना आता पुन्हा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येत्या बजेट अधिवेशनात मागील वर्षी पेक्षा जादा निधी देण्याचे आश्वासन आमदारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पदाधिकारी व धरण जनआंदोलन समितीतील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळास दिले.
पाडळसरे धरण म्हणजे तालुक्यासाठी जलसंजीवनी असल्याने आमदार अनिल पाटील यांनी सुरवातीपासूनच धरण कामास गती देण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत, त्याचाच परिणाम म्हणून कामाच्या दृष्टीने अनेक तांत्रिक अडचणी दूर होऊन धरणाच्या डिझाईन मध्ये बदल होऊन मंजुरी मिळाली आहे. याशिवाय मागील वर्षी 135 कोटी भरीव निधी दिल्याने कामास गती मिळाली आहे. यावर्षी देखील धरणासाठी भरीव निधी मिळावा म्हणून आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा केला.
मंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळावे यासाठी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांचे मोठे शिष्टमंडळ सोबत घेऊन मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन, काहीही करा पण आम्हाला धरणासाठी जादा निधी द्या.. असा आग्रह धरला.
दरम्यान जयंत पाटील यांनी शिष्टमंडळास सांगितले की पाडळसरे धरण पूर्ण करण्याचे स्वप्न आमदार अनिल पाटील यांचे असल्याने ते समोर आले की आम्हाला धरणच दिसते. त्यांनी नेहमीच शासनाकडे त्यासाठी आग्रह धरला आहे. आणि त्यांना दिलेल्या शब्दाची पूर्ती करणे, हे शासनाचे देखील ध्येय आहे. त्यामुळे काळजी करू नका.. येत्या बजेटमध्ये आम्ही मागील वर्षी पेक्षा जादा निधी देणार आहोत. याशिवाय धरणाच्या पूर्ततेसाठी जे जे करावे लागेल ते हे शासन केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.
मुडी व मांडळ फड बंधाऱ्यासाठीही निधीची मागणी..
अमळनेर तालुक्यातील मुडी व मांडळ फड बंधाऱ्यासाठीही निधी व प्रशासकीय मान्यता द्यावी जेणेकरून या परिसरातील गावांना जलप्रवाह उपलब्ध होऊन ग्रामिण जनतेला याचा विशेष लाभ होईल अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली. या मागणीला देखील मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या बजेट अधिवेशनात यासाठी निधी उपलब्ध करण्याची ग्वाही दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटिक, प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील, कामगार नेते एल.टी. नाना पाटील, माजी संचालक बाजार समिती अमळनेर अनिल शिसोदे तसेच पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, प्रताप साळी, रणजित शिंदे, प्रा सुनिल पाटील, नरेंद्र पाटील, अजयसिंग पाटील, हेमंत भांडारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.