जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळासाठी रविवारी अत्यंत चुरशीच्या आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. सायंकाळी ४ वाजेपर्यंत आलेल्या अंतिम आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण २,९२१ मतदारांपैकी २,८३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, मतदानाची टक्केवारी ९७.०६ इतकी नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील तब्बल १३ केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे पालकमंत्री गुलाबराव पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आजी माजी आमदार आणि दिग्गजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.



विविध मतदारसंघांत मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यामध्ये जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव आणि एरंडोल या ११ तालुक्यांतील विविध कार्यकारी सहकारी संस्था (वि.का.) मतदारसंघांसह बोदवड आणि धरणगाव येथील ‘इतर’ मतदारसंघांतही सर्व पात्र मतदारांनी मतदान केल्याने तेथे शंभर टक्के मतदानाची नोंद झाली.
शंभर टक्के मतदान झालेली केंद्रे वगळता जामनेरच्या ‘इतर’ मतदारसंघात सर्वाधिक ९९.२२ टक्के (१२९ पैकी १२८ मतदार) मतदान झाले. त्याखालोखाल पाचोरा (९८.२८ टक्के), अमळनेर (९८.१८ टक्के) आणि चाळीसगाव (९८.१५ टक्के) येथील ‘इतर’ मतदारसंघांतही मतदानाचा टक्का वरचा राहिला.
दुसरीकडे, यावलच्या ‘इतर’ मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वात कमी म्हणजेच ९३.०९ टक्के (३०४ पैकी २८३ मतदार) मतदान नोंदवले गेले. त्यासोबतच चोपडा ‘इतर’ मतदारसंघात ९३.७५ टक्के (१४४ पैकी १३५ मतदार) आणि जळगाव ‘इतर’ मतदारसंघात ९३.९५ टक्के (३१४ पैकी २९५ मतदार) मतदान झाले.
सहकारी क्षेत्रातील सत्तेच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत विक्रमी मतदान झाल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली असून, आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष मतमोजणी आणि अंतिम निकालाकडे लागले आहे.







