जळगाव / पाचोरा, प्रतिनिधी : शेतीच्या व्यवहारासाठी आलेल्या कन्नड येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्यांचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे उघडकीस आली आहे. डोक्यात लोखंडी पाईपचे वार करून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चक्क गोणीत भरून बहुळा नदीत फेकून देण्यात आला होता. मात्र, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौशल्याने तपासाची चक्रे फिरवत या ‘ब्लाईंड’ हत्याकांडाचा छडा लावला असून, दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. संजय धनराज तेली (वय ५०, रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे दुर्दैवी मृत व्यक्तीचे नाव आहे.

१८ नोव्हेंबर २०२६ रोजी संजय तेली हे शेतीच्या व्यवहारासाठी गोराडखेडा (ता. पाचोरा) येथे आले होते. मात्र, ते बेपत्ता झाल्याने अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केल्याची तक्रार त्यांच्या मित्राने पाचोरा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदवला गेला. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपासाचे आदेश दिले.

एलसीबीच्या पथकाने गोराडखेडा परिसरात गुप्त माहितीदारांचे जाळे सक्रिय केले. विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित राहुल धर्मा पाटील (वय ४५) आणि संजय वामन भिल्ल (वय ५५, दोघे रा. गोराडखेडा) यांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच संपूर्ण हत्याकांडाचा थरार समोर आला.
मुख्य आरोपी राहुल पाटील याचा मयत संजय तेली यांच्यासोबत शेतीचा वाद होता. याच वादातून त्याने लोखंडी पाईपने संजय तेली यांच्या डोक्यात जबर प्रहार करून त्यांचा जागीच खून केला. त्यानंतर कृत्य लपवण्यासाठी सहकारी संजय भिल्ल याच्या मदतीने मृतदेह एका गोणीत कोंबला आणि बहुळा नदीच्या पात्रात फेकून दिला. आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी नदीत शोधमोहीम राबवून मृतदेह हस्तगत केला. याप्रकरणी खुनासह पुरावा नष्ट केल्याच्या कलमांची (१०३(१), २३८, १४०(२), ३(५), ३१५) वाढ करण्यात आली असून, पुढील तपास पाचोरा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रदीप शेवाळे करत आहेत.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि सोपान गोरे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोना राहुल पाटील, पोकॉ जितेंद्र पाटील, रतन गिते, ईश्वर पाटील, भूषण पाटील, चालक पोहेकॉ बाबासाहेब पाटील तसेच पाचोरा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रदीप शेवाळे आणि पोहेकॉ दिलीप वाघमोडे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला.








