जळगाव महापालिकेची बंद व नादुरुस्त वाहने तातडीने दुरुस्त करा; उपमहापौरांचे निर्देश

अग्निशमन व अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना प्राधान्य देण्याच्या सूचना

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेच्या वाहन विभागाचा उपमहापौरांच्या अध्यक्षतेखाली १८ नोव्हेंबर रोजी आढावा घेण्यात आला. यावेळी महापालिकेची बंद व नादुरुस्त वाहने तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचे निर्देश उपमहापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत महापालिकेच्या वाहनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेसीबी, रुग्णवाहिका, पोकलेन आदींसह एकूण चार वाहने बंद अवस्थेत आहेत. तसेच काही वाहनांना किरकोळ, तर काही वाहनांना मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी अग्निशमन विभागासह अत्यावश्यक सेवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाहनांची दुरुस्ती प्राधान्याने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहनांच्या देखभाल व दुरुस्ती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून वाहनांची नियमित तपासणी व देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले.
महापालिकेची वाहने शहरातील स्वच्छता, आरोग्य, नागरी सुविधा आणि आपत्कालीन सेवांसाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे केवळ दुरुस्तीअभावी कोणतेही वाहन बंद राहू नये आणि वाहनांअभावी नागरिकांच्या अत्यावश्यक सेवांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वाहन विभागाने कार्यक्षमतेने काम करावे, असे उपमहापौरांनी स्पष्ट केले.
या बैठकीस वाहन विभागप्रमुख संदीप मोरे, उपायुक्त निर्मला गायकवाळ, अग्निशमन विभागप्रमुख अश्वजित घरडे, भरत बारी, उपायुक्त पंकज गोसावी आणि सहाय्यक आयुक्त संजय राऊत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.








