जळगाव, प्रतिनिधी : अनेक दिवसांपासून गहाळ झालेल्या मोबाईलच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना कासोदा पोलिसांनी दिवाळीपूर्वी आनंदाची भेट दिली आहे. सीईआयआर (CEIR) पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी १० मोबाईल शोधून काढले. अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गहाळ मोबाईल शोधून ते संबंधित नागरिकांना परत मिळवून देण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कासोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत महिला पोलीस अंमलदार आरती हापसे यांनी सीईआयआर पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे १० मोबाईल शोधून हस्तगत केले. त्यानंतर हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले.
दिवाळीपूर्वीच हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. कासोदा पोलिसांची ही कामगिरी नागरिकांसाठी दिवाळीची अनोखी भेट ठरली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. महिला पोलीस अंमलदार आरती हापसे यांनी या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.









