जळगाव, प्रतिनिधी : मानव सेवा विद्यालय, जळगाव येथील कलाशिक्षक तथा पर्यावरण मित्र सुनील दाभाडे यांनी रंगीत खडूंच्या साहाय्याने शाळेच्या फळ्यावर एक अत्यंत बोलके फळाचित्र रेखाटले आहे. या चित्रात वृक्षतोडीमुळे निसर्गाची होणारी हानी भावपूर्ण रीतीने मांडण्यात आली आहे.

कुऱ्हाडीच्या घावाने जखमी झालेल्या झाडाचा दुःखी चेहरा आणि तोडलेल्या झाडाच्या बुंध्यातून बाहेर पडणारे नवजात रोपटे, हे चित्र पाहणाऱ्यांच्या मनाला अंतर्मुख करणारे आहे. “झाडे जगवा, निसर्ग वाचवा!” हा या कलाकृतीचा केंद्रबिंदू असून, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी रुजविणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

उत्कृष्ट रंगसंगती आणि रेखाटनातील बारकाव्यांमुळे हे फळाचित्र अत्यंत लक्षवेधी ठरले आहे. या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कला व पर्यावरणप्रेमींकडून त्यांचे कौतुक होत आहे.








