जळगाव, प्रतिनिधी : जळगावच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी असून, ग्रॅपलिंग-मल्लयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन पैलवानांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. हितांशू राजपूत, भूषण हटकर आणि शरद हटकर यांनी उत्तराखंड येथे २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या स्पर्धेत दोन कांस्यपदके आणि एक रौप्यपदक पटकावले. या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांनी कुस्ती क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडूंना वेळोवेळी सहकार्य आणि प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या पाठबळामुळे खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी तसेच पुढील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे सांगण्यात आले.

जळगावच्या या तीन पैलवानांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल क्रीडाप्रेमींकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. आगामी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये हे तिन्ही खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करून देशाचा नावलौकिक वाढवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








