जळगाव, प्रतिनिधी : शहरातील स्वच्छता आणि नागरी सुविधांचा आढावा घेत महापौर दीपमाला काळे यांनी ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत’ बुधवारी (दि. २८ ऑक्टोबर) वॉर्ड क्रमांक ११ मधील विविध भागांची पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. पथदिव्यांची दुरुस्ती, गटारींची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाण्याचा अपव्यय आणि मांसविक्री दुकानांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

वॉर्डातील जुन्या पथदिव्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार ते तातडीने बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या. नळाला पाणी आल्यानंतर रस्ते धुण्यासाठी पाण्याचा वापर करणाऱ्यांची तपासणी करून संबंधितांना नोटीस बजावण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.

रामानंद नगर बसस्थानक परिसर आणि घाटाजवळील वसाहतींमधील मोकळ्या भूखंडांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जेसीबीच्या मदतीने या ठिकाणची साफसफाई करण्यात आली. महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी रामानंद नगर बसथांबा आणि घाट परिसरात वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी नागरिकांनी केली
श्याम नगर परिसरातील अक्षय साठे नगरजवळील शौचालय तातडीने हटविण्याचे निर्देश महापौरांनी दिले. साठे नगरसमोरील रस्ते आणि गटारी मोकळ्या करून परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
वाघ नगर परिसरातील मांसविक्री दुकानांच्या परवान्यांची तपासणी करून स्वच्छतेबाबत सक्त सूचना देण्यात आल्या. या दुकानांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत संबंधित दुकानांची चौकशी करावी आणि आवश्यकतेनुसार स्थलांतराबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश महापौरांनी दिले. भविष्यात मांसविक्री दुकानांना परवाने देताना सर्व बाबींचा सखोल विचार करण्याची सूचनाही त्यांनी केली.
वॉर्डातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने काम देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कचरा संकलनासाठी बीव्हीजी कंपनीकडून पिकअप व्हॅन उपलब्ध करून घेऊन परिसरातील कचरा नियमित उचलण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्यात स्थानिक नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे, संतोष पाटील आणि नगरसेवक पियुष कोल्हे उपस्थित होते. याशिवाय आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, बांधकाम विभागाचे अभियंता मनोज वनेरे, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, स्वच्छता निरीक्षक मालती रंधे यांच्यासह आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.








