जळगाव, प्रतिनिधी : भडगाव परिसरातील अवैध वाळू उपशाची गोपनीय पाहणी करण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात तहसीलदार शीतल सोलाट जखमी झाल्या. वाक रस्त्यावरील नदीपात्राकडे जाणाऱ्या कच्च्या मार्गावर दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, जखमेवर टाके घालण्यात आले आहेत.

भडगाव परिसरातील नदीपात्रातून रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करून चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. या प्रकाराची पाहणी करून कारवाई करण्याच्या उद्देशाने तहसीलदार शीतल सोलाट यांनी गोपनीयता राखत आमडदे येथील तलाठ्याच्या दुचाकीवरून घटनास्थळाकडे जाण्याचा निर्णय घेतला.

रात्रीच्या सुमारास वाक रस्त्यावरून नदीपात्राकडे जाणाऱ्या कच्च्या मार्गावर खडी आणि निसरड्या मातीमुळे दुचाकीचे चाक अचानक घसरले. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही खाली पडले. या अपघातात तहसीलदार शीतल सोलाट यांच्या पायाला खोलवर दुखापत झाली.
अपघातानंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने जखमेवर टाके घालण्यात आले. अवैध वाळू उपशाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांनाच अपघाताला सामोरे जावे लागल्याने या घटनेची चर्चा सुरू आहे.








