प्रतिनिधी जळगाव मेहरुण परिसरातील व्यंकटेश कॉलनीतील ४८३.०९ चौरस मीटर जागेची बनावट कागदपत्रे तयार करून ती परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यंकटेश कॉलनीतील प्लॉट क्रमांक २ मध्ये सुमनबाई रघुनाथ पाटील (७६, रा. इंद्रप्रस्थ नगर) यांची ४८३.०९ चौरस मीटर जागा आहे. त्या सध्या खारघर, जिल्हा रायगड येथे वास्तव्यास आहेत.

दरम्यान, वनिता कैलास पाटील (४५, रा. जोशीपेठ), ममता प्रदीप पाटील (३४, रा. रावेर) आणि अन्य तिघांनी या जागेसंदर्भात बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे मेहरुण तलाठी कार्यालयात सादर करून संबंधित जागा स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे. हा प्रकार २४ फेब्रुवारी ते २२ ऑगस्टदरम्यान घडला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुमनबाई पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध वृद्ध महिला आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.









