जळगाव, प्रतिनिधी : प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नाकाबंदीदरम्यान इनोव्हा वाहनातून वाहतूक केला जाणारा केसरयुक्त विमल पानमसाला आणि ‘V-1’ सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत ८ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित माल आणि ७ लाख रुपये किमतीची इनोव्हा, असा एकूण १५ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी चाळीसगाव येथील वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१२ ऑक्टोबर रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून नाकाबंदी सुरू होती. यावेळी पहूर येथून चाळीसगावच्या दिशेने जाणारी इनोव्हा (क्र. एमएच १८ एजे ६५२५) पोलिसांच्या निदर्शनास आली. नाकाबंदीच्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकी इंगळे आणि डायल ११२ वरील पोलीस कॉन्स्टेबल मनोज महाजन यांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन न थांबविता पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.

वाहनचालकाची चौकशी केली असता, त्याचे नाव आबा विठ्ठल पाटील (वय ५४, रा. माऊली नगर, चाळीसगाव, जि. जळगाव) असे निष्पन्न झाले. घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिम्मतराव बाविस्कर यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून सरकारतर्फे फिर्याद दिली.

प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पोलीस नाईक दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकी इंगळे, शाम हटकर आणि मनोज महाजन यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा अवैध व्यवसायांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.









