जामनेर, प्रतिनिधी : येथील साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानच्या पुढाकाराने नुकतीच एक महत्त्वपूर्ण सामाजिक सद्भाव बैठक पार पडली. या बैठकीला शहरातील तब्बल ५९ समाजांचे प्रमुख सदस्य आणि ७ आध्यात्मिक मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समाजातील वाढती गुन्हेगारी, व्यसनाधीनता, तरुण मुलींचे वाढते पलायन आणि आई-वडिलांप्रती कमी होत चाललेला आदरभाव यांसारख्या गंभीर समस्यांवर या बैठकीत सखोल विचारमंथन करण्यात आले.

या सर्व सामाजिक समस्यांवर मात करण्यासाठी आणि पुढच्या पिढीवर योग्य संस्कार घडवण्यासाठी एका विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. याच उद्देशाने येत्या १३ ऑक्टोबर रोजी जामनेर शहरात प्रा. वसंत हंकारे सर यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

आई-वडिलांचा सन्मान जपणे, नैतिक मूल्यांची जपणूक करणे आणि युवा पिढीला योग्य दिशा दाखवणे हा या व्याख्यानाचा मुख्य हेतू आहे. साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला असून शहरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.









