इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव, प्रतिनिधी : इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून जळगाव आणि नाशिक येथील हॉटेलमध्ये इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप एका तरुणीने केल्याने जळगाव शहर पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आकाश गजानन चव्हाण (३५, रा. बोरगाव, ता. जि. अकोला, ह. मु. चित्रकूट, मध्य प्रदेश) याच्याशी इन्स्टाग्राम अॅपद्वारे ओळख झाली. आरोपीने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्यानंतर २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान जळगाव शहरातील सारा हॉटेलमध्ये तसेच १५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० ते ११ वाजेदरम्यान नाशिक येथील टाउन हाऊस हॉटेलमध्ये नेऊन आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
दरम्यान, आरोपीने लग्न करण्यास नकार देत मानसिक त्रास दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात आकाश चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास PSI सावित्री ढगे यांच्याकडे सोपविण्यात आला असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपी अद्याप अटकेत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.









