जामनेर, (प्रतिनिधी) : तेली समाज पंच मंडळ, जामनेर यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी व समाज बांधवांचा गुणगौरव सोहळा हिवरखेडा रोडवरील श्री संत संताजी जगनाडे महाराज सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते.

या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जामनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन, उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौधरी आणि सचिव अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय तालुक्यातील विविध गावांमधील समाज अध्यक्ष व जिल्हाभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच कला, क्रीडा आणि शासकीय सेवेत रुजू झालेल्या समाज बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी शासकीय दंत महाविद्यालय, जळगाव येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. कोमल नाना चौधरी आणि डॉ. प्रथमेश निलेश पाटील यांनी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षीय भाषणात विजय चौधरी यांनी समाज संघटन आणि विविध सामाजिक विषयांवर समाजबांधवांशी संवाद साधला.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विक्रम चौधरी यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी तेली समाज पंच मंडळ जामनेरचे अध्यक्ष सोपान चौधरी, उपाध्यक्ष निखिल भोलाने, सचिव रामेश्वर पाटील यांच्यासह सुरेश तेली, पप्पू चौधरी, मुकेश चौधरी, किरण चौधरी आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.








