जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील विविध भागांत बसवण्यात आलेल्या वॉटर मीटरच्या सदोष कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून वाढत्या तक्रारी आणि प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका वैशाली पाटील यांच्या निवेदनाची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (दि. २२) दुपारी प्रभाग १३ मधील ऑक्सिजन पार्क व रायसोनी नगर परिसरात थेट भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीदरम्यान वॉटर मीटर कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली असून महापौरांनी कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत चांगलीच कानउघाडणी केली. रायसोनी नगर येथे झालेल्या या पाहणीवेळी तक्रारदार नागरिक आणि वॉटर मीटर कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना समोरासमोर आणून महापौरांनी चर्चा घडवून आणली. पूर्वी वॉटर मीटर नव्हते तेव्हा घरात पूर्ण दाबाने (फोर्सने) आणि मुबलक पाणी येत होते; मात्र वॉटर मीटर बसवल्यापासून पाण्याचा दाब पूर्णपणे कमी झाला असून पुरेसे पाणी भरले जात नाही, अशा संतप्त तक्रारी नागरिकांनी महापौरांकडे मांडल्या.

*कंत्राटदाराची पोलखोल; प्रात्यक्षिकात अपयश*
नागरिकांच्या तक्रारींवर वॉटर मीटरच्या कर्मचाऱ्यांकडे कोणतेही स्पष्टीकरण नव्हते. यावर महापौरांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरत “मीटरमधून पाणी पास करून दाखवा” असे सांगत थेट प्रात्यक्षिक (डेमो) दाखवण्याचे आव्हान दिले. मात्र, कर्मचाऱ्यांना ते दाखवण्यात अपयश आले. विशेष म्हणजे, वॉटर मीटरच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीबाबत (मेकॅनिझम) कंत्राटदाराकडून अद्याप महापालिका प्रशासनाला व पदाधिकाऱ्यांना कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नसल्याची बाबही यावेळी समोर आली.

*तक्रार वही आणि रजिस्टरवरून कर्मचाऱ्यांना विचारला जाब*
पाहणीदरम्यान कर्मचाऱ्यांकडे तक्रार नोंदवही (रजिस्टर) नसल्याचे दिसून आले. तसेच जे रजिस्टर कर्मचारी मेंटेन करतात ते अत्यंत अव्यवस्थित असल्याचे उघडकीस आल्याने महापौरांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. वॉटर मीटर ठेकेदाराकडून महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये अजिबात समन्वय ठेवला जात नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या सर्व प्रकारानंतर महापौर दीपमाला काळे यांनी अधिकाऱ्यांना कडक ताकीद दिली की, पुढील आठवड्यात महापौर आणि महापालिका आयुक्तांसमोर वॉटर मीटरचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (डेमो) दाखवून त्याच्या पूर्ण मेकॅनिझमची सविस्तर माहिती सादर करण्यात यावी.
या पाहणीच्या प्रसंगी भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रकाश बालाणी, स्थानिक नगरसेविका सुरेखा तायडे, महापालिकेचे अधिकारी योगेश वाणी, वॉटर मीटरचे कर्मचारी जितेंद्र पाटील, करण जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौरांनी दिलेल्या प्रमुख सूचना
वॉटर मीटर कामांबाबत आवश्यक सुधारणा व मागण्या:
१. मीटरचे स्थलांतर : जे वॉटर मीटर सध्या घराच्या बाहेर बसवले आहेत, ते (जागा उपलब्ध असल्यास) घराच्या आत किंवा सुरक्षित जागेवर बसवण्यात यावेत.
२. संरक्षक बॉक्स : प्रत्येक वॉटर मीटरला सुरक्षिततेसाठी ‘प्रोटेक्शन बॉक्स’ बसवण्यात यावा.
३. गटारी व विशेष ठिकाणांसाठी विशेष बॉक्स : गटारींवर बसवलेल्या मीटरसाठी किंवा ज्या ठिकाणी ‘स्टँडर्ड साईझ’चे बॉक्स बसत नाहीत, त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार योग्य साईझचे स्पेशल बॉक्स बनवून बसवण्यात यावेत.
४. बिलिंगबाबत स्पष्टता : वॉटर मीटरच्या बिलिंग पद्धतीबाबत नागरिकांमध्ये संपूर्ण स्पष्टता असावी.
५. फिटिंग आणि साहित्याचा दर्जा: मीटर बसवण्यासाठी वापरण्यात येणारे फिटिंग साहित्य आणि त्याची गुणवत्ता उच्च दर्जाची असावी.









