जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विवाहयोग्य मुलींसाठी राज्य शासनाकडून “कन्यादान योजना” सुरु करण्यात आली आहे.

सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक पात्र जोडप्यास शासनामार्फत रुपये 25 हजार आर्थिक सहाय्य तर सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक पात्र जोडप्यामागे रुपये 4 हजार इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा तसेच योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित संस्था, समाजसेवी संघटना व पात्र लाभार्थीनी पुढाकार घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विशाल राठोड यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी तसेच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजक यांनी शासनाने निर्धारित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक असून आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज ‘इतर मागास बहुजन कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन मायादेवी मंदिरासमोर, महाबळरोड, जळगाव’ येथे सादर करावेत.

तसेच या योजनेची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ मिळवून देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.







