जळगाव, (प्रतिनिधी) : आरोग्य सेवा आणि रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी परिचारिकांचे नि:स्वार्थ योगदान, समर्पण आणि अथक परिश्रम यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या मुख्य परिचारिका अधीक्षक कार्यालयासमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यंदाचा परिचारिका दिन “आमच्या परिचारिका, आमचे भविष्य: सक्षम परिचारिका जीव वाचवतात” या विशेष संकल्पनेवर आधारित होता. आरोग्य व्यवस्थेत परिचारिका हा कणा असून, त्यांच्या कौशल्यामुळे आणि तत्परतेमुळे रुग्णांना नवजीवन मिळते, हा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर आधुनिक परिचारिका सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कुशल आणि प्रशिक्षित परिचारिकांची आरोग्य व्यवस्थेतील भूमिका अधोरेखित केली. समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी परिचारिका देत असलेले योगदान अनन्यसाधारण असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.
रुग्णालयातील परिचारिका वर्गाच्या समर्पित आणि मानवतावादी सेवेचे यावेळी कौतुक करण्यात आले. “परिचारिका केवळ उपचार करत नाहीत, तर त्या रुग्णांना मानसिक आधारही देतात. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत होत आहे,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका अधीक्षक आणि मोठ्या संख्येने परिचारिका कर्मचारी उपस्थित होते.








