जळगाव, (प्रतिनिधी) : “दुःख वाटून घेऊया आणि सुख वाढवूया” हा उदात्त विचार उराशी बाळगून, संकटात सापडलेल्यांना आधार देणे हीच खरी माणुसकी आहे. याच भावनेतून लिनेस क्लबच्या वतीने एका गरजू कुटुंबाचा कोलमडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
जळगावात काही दिवसांपूर्वी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका कुटुंबातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. या आपत्तीमुळे हतबल झालेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी लिनेस क्लबने पुढाकार घेतला. क्लबच्या अध्यक्षा रेखा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या पीडित कुटुंबाला दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची मदत करण्यात आली.
‘माणुसकी जपणे हेच आमचे ध्येय’
या प्रसंगी बोलताना अध्यक्षा रेखा वर्मा म्हणाल्या की, “कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू फुलवणे हेच आमचे ध्येय आहे. संकटाच्या वेळी जो धावून जातो, तोच खऱ्या अर्थाने माणुसकीचे नाते जपतो. याच विचाराने आमचे सर्व पदाधिकारी कार्य करत आहेत.”
या कौतुकास्पद कार्यासाठी पूर्व प्रांत अध्यक्ष लता बनवट, अनिता काकरिया, सरिता कोठारी, विजया बाफना, महेंद्र रायसोनी, ललिता श्रीश्रीमाळ, प्रेमलता डाकलीया, नीला चौधरी आणि पूनम तिवारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. लिनेस क्लबच्या या संवेदनशील उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.







