जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहराच्या राजकीय इतिहासात आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी विजयाचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास टाकत जळगावकरांनी ४६ पैकी ४६ जागांवर भाजपला कौल देऊन अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. हा विजय केवळ आकड्यांचा नसून, राजूमामांनी गेल्या काही वर्षांत शहरासाठी घेतलेल्या कष्टांची आणि विकासाच्या दूरदृष्टीची पावती आहे.
कर्जमुक्ती ते विकासगंगा: जळगावचा कायापालट
२०१४ च्या सुमारास जळगाव महानगरपालिका कर्जाच्या प्रचंड ओझ्याखाली दबलेली होती. प्रशासकीय अडचणी आणि आर्थिक चणचणीमुळे शहराचा विकास खुंटला होता. मात्र, आमदार राजूमामा भोळे यांनी शहराची धुरा सांभाळल्यानंतर परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. त्यांनी सरकारदरबारी सातत्याने पाठपुरावा करून महापालिकेला कर्जमुक्त करण्यात यश मिळवले. ही जळगावच्या विकासातील सर्वात मोठी क्रांती ठरली.
पायाभूत सुविधांचे जाळे आणि रोजगाराची संधी
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारलेले उड्डाणपूल, बायपासचे काम आणि समांतर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावून त्यांनी जळगावकरांचा प्रवास सुखकर केला. केवळ रस्तेच नाही, तर शहरात नवीन एमआयडीसी मंजूर करून आणण्यासाठी त्यांनी दिलेला लढा आता यशस्वी झाला असून, यामुळे भविष्यात स्थानिकांसाठी रोजगाराची मोठी दारे उघडली जाणार आहेत. मतदारांनी या ‘विकास आराखड्याला’ आपला पाठिंबा दर्शवला आहे.
जनसंपर्क: एक कौटुंबिक नाते
जेव्हा भाजपचे अनेक दिग्गज नेते इतर जिल्ह्यांच्या जबाबदारीत व्यस्त होते, तेव्हा राजूमामांनी संपूर्ण जळगाव शहराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ ग्रुपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांशी संवाद असो किंवा रात्री उशिरापर्यंत सामान्य जनतेच्या समस्या सोडवणे असो; राजूमामांनी स्वतःला राजकारणी न मानता ‘घरातील सदस्य’ म्हणून लोकांमध्ये स्थान मिळवले आहे. याच जिव्हाळ्याच्या नात्यामुळे भारतीय जनता पार्टीला ४६ पैकी ४६ जागांवर विजय मिळवता आला.
विकासाचे ‘डबल इंजिन’ आता सुसाट धावणार!
या ऐतिहासिक विजयानंतर आमदार भोळे यांनी आपला पुढचा संकल्प स्पष्ट केला आहे. ते म्हणतात,
“शहरातील प्रत्येक गल्लीत विकासाची गंगा पोहोचवणे आणि प्रत्येक हाताला रोजगार देणे, हेच माझे आताचे ध्येय आहे.”
विधानसभेपाठोपाठ महापालिकेत मिळालेल्या या यशामुळे जळगावच्या प्रगतीला आता ‘डबल इंजिन’चा वेग मिळणार आहे. खऱ्या अर्थाने राजूमामा भोळे हे जळगावच्या राजकारणातील ‘जननायक’ म्हणून उदयास आले आहेत.







