जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी भागात गुरुवारी दुपारी वैयक्तिक वादातून गोळीबाराची घटना घडली. मिस्तरी कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून तुषार सोनवणे नामक व्यक्तीने मुस्तफा नावाच्या तरुणावर गोळीबार केला. सुदैवाने, गोळी हवेत सुटल्याने मुस्तफा हा थोडक्यात बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संशयित आरोपी सध्या फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुस्तफा हा मिस्तरी काम करतो. त्याने संशयित आरोपी तुषार सोनवणे याच्याकडे आपल्या कामाचे थकीत पैसे मागितले होते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर टोकावर गेल्याने संशयित तुषारने आपल्याकडील शस्त्र काढून मुस्तफाच्या दिशेने गोळी झाडली. गोळीबार झाला तेव्हा मुस्तफाने प्रसंगावधान राखल्याने आणि गोळी हवेत गेल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी पोलिसांना गोळीची पुंगळी मिळून आली आहे.
पोलीस प्रशासनाची धाव..
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनातर्फे तत्परता दाखवण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून फरार आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
घटनेचा निवडणुकीशी संबंध नाही..
शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने या घटनेबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, “हा प्रकार केवळ वैयक्तिक वादातून आणि मजुरीच्या पैशांच्या कारणावरून घडला आहे. या घटनेचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही,” असे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







