जळगाव, (प्रतिनिधी) : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचे कर्तव्य बजावणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हाच संदेश देत जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आज आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला.
आज दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी ठीक ७:३० वाजता अशोक जैन आणि सौ. ज्योती जैन यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला सहभाग नोंदवला. जळगाव शहरातील एम. जे. कॉलेज परिसरातील ए. टी. झांबरे विद्यालयात त्यांनी आपले मतदान केले. सकाळच्या सत्रातच त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून एक जागरूक नागरिक म्हणून आदर्श घालून दिला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “देशाच्या आणि शहराच्या प्रगतीसाठी मतदान करणे हे केवळ कर्तव्य नसून तो आपला हक्क आहे. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे.”
यावेळी जैन परिवारातील इतर सदस्यही उपस्थित होते. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह दिसून येत असून, अशोक जैन यांच्या उपस्थितीने मतदानाच्या जनजागृतीला अधिक बळ मिळाले आहे.








