प्रशासन सज्ज; ३,५५५ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची माहिती
जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून, संपूर्ण प्रशासन मतदानासाठी सज्ज झाले आहे. येत्या गुरुवारी, १५ जानेवारी रोजी शहरातील ५१६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन दुपारी २ वाजेपर्यंत शहराच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, शोभा बाविस्कर आणि सहा निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. एकूण ५१६ मतदान केंद्रांवर ३,५५५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात २०० महिला कर्मचारी आणि ५२ क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ५१६ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून ७२ मास्टर ट्रेनर्सनी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. मंगळवारपासून एमआयडीसी येथील वखार महामंडळ (क्र. १४ व १७) येथून निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
विशेष मतदान केंद्रे..
यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी विशेष केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये महिला संचलित १ ‘पिंक बूथ’, दिव्यांग मतदारांसाठी २ खास केंद्रे आणि १२ ‘आदर्श मतदान केंद्रांचा’ समावेश आहे.
मतदानाची वेळ आणि नियमावली..
गुरुवारी १५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘मॉक पोल’ घेतला जाईल. त्यानंतर सकाळी ७ वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल. सायंकाळी ५:३० वाजता मतदानाची वेळ संपणार असली, तरी त्यावेळेस जे मतदार रांगेत असतील, त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता येईल. मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन सीलबंद करून वखार महामंडळातील स्ट्रॉंग रूममध्ये कडक बंदोबस्तात ठेवल्या जातील.
१४ टेबलवर होणार मतमोजणी..
शुक्रवारी १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यासाठी प्रशासनाने ६ विभागांतर्गत एकूण १४ टेबलांचे नियोजन केले आहे. सुरुवातीला टपाली मतपत्रिका मोजल्या जातील आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी होईल.
विभागवार मोजणीचे स्वरूप..
विभाग १: प्रभाग १, २, ३ (प्रत्येकी ६ राऊंड).
विभाग २: प्रभाग ४ (६ राऊंड), प्रभाग ५ व ६ (प्रत्येकी ७ राऊंड).
विभाग ३: प्रभाग ७ (६ राऊंड), प्रभाग ११ व १२ (प्रत्येकी ७ राऊंड).
विभाग ४: प्रभाग १३ (७ राऊंड), प्रभाग १४, १८, १९ (प्रत्येकी ५ राऊंड).
विभाग ५: प्रभाग १५, १६, १७ (प्रत्येकी ६ राऊंड).
विभाग ६: प्रभाग ८ (८ राऊंड), प्रभाग ९ (९ राऊंड), प्रभाग १० (७ राऊंड).
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांना जागीच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जे उमेदवार अनुपस्थित राहतील, त्यांना महापालिकेतून प्रमाणपत्र घ्यावे लागेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.







