जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राजकीय समीकरणांनी वेगवान वळण घेतले. महायुतीने निवडणुकीच्या रिंगणात जोरदार मुसंडी मारली असून, मतदानापूर्वीच महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे ६ आणि शिवसेनेचे (शिंदे गट) ६ उमेदवार विजयी झाले आहेत. आता महापालिकेच्या उर्वरित ६३ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक पार पडणार आहे.
असा रंगला ‘बिनविरोध’चा थरार
निवडणुकीच्या या प्रक्रियेत भाजपच्या उज्वला बेंडाळे (प्रभाग १२ ब) यांनी सर्वप्रथम विजयाचा श्री गणेशा केला होता. त्यानंतर गुरुवारी माघारीच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी, प्रतिभा गजानन देशमुख आणि डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती.
आज, शुक्रवार २ जानेवारी रोजी माघारीच्या अंतिम दिवशी सकाळी मोठी राजकीय घडामोड घडली. प्रभाग १९ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार सरला सुनील सोनवणे यांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या रेखा चुडामण पाटील यांचा विजय सुकर झाला.
दिग्गजांच्या सुपुत्रांचा विजय निश्चित
दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्रभाग क्रमांक ७ क मध्ये शेवटच्या अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल सुरेश भोळे यांचा विजय निश्चित झाला. तसेच प्रभाग ७ अ मध्ये भाजपच्या दीपमाला मनोज काळे यांच्या विरोधात असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार जयश्री हिवराळे यांनी माघार घेतल्याने महायुतीचे पारडे जड झाले. प्रभाग २ अ मध्ये शिवसेनेचे सागर श्याम सोनवणे यांच्या विरोधात असलेल्या ५ अपक्ष उमेदवारांनी छाननीनंतर माघार घेतली.
अंतिम दिवशी विजयी ठरलेले अन्य उमेदवार:
दुपारपर्यंत चित्र स्पष्ट झाले असून खालील उमेदवारांनी बिनविरोध बाजी मारली आहे:
डॉ. विश्वनाथ खडके (भाजप – प्रभाग १६ अ)
वैशाली अमित पाटील (भाजप – प्रभाग १३ क)
अंकिता पंकज पाटील (भाजप – प्रभाग ७ ब)
गणेश उर्फ विक्रम सोनवणे (शिवसेना – प्रभाग १९ ब)
महायुतीचे संख्याबळ १२ वर..
अर्ज माघारीच्या प्रक्रियेअंती महायुतीचे संख्याबळ आता १२ वर पोहोचले आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील समन्वय आणि विरोधकांनी घेतलेली माघार यामुळे महायुतीने मतदानापूर्वीच आघाडी घेतली आहे. आता सर्वांचे लक्ष उर्वरित ६३ जागांकडे लागले असून, येत्या काळात जळगावच्या राजकारणात आणखी काय उलथापालथ होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.








