धरणगाव, (प्रतिनिधी) : येथील विद्यार्थ्यांनी २८ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या १५ व्या राष्ट्रीय व ८ व्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत धरणगावच्या दोन विद्यार्थ्यांनी मोलाची कामगिरी करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
वेदांत रितेश जंगले याने ‘लेव्हल डी’ मध्ये उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली. तर, कार्तिकराज शंभूकुमार राजक याने ‘लेव्हल ३’ मध्ये ‘रनर-अप’ (प्रथम उपविजेता) ठरून चषकावर आपला हक्क सांगितला. या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे धरणगाव परिसरात कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल माहिती देताना मार्गदर्शक शिक्षिका छाया मनोज मोरे म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांनी घेतलेली सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले आहे. भविष्यातही हे विद्यार्थी अशीच उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”








