जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास थरारक घटना घडली. जुन्या वादाचा राग मनात धरून एका २५ वर्षीय तरुणाने १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
जखमी तरुणाचे नाव साई गणेश बोराडे (वय १८, रा. शंकरराव नगर, जळगाव) असे आहे. साई हा देवकर महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे (२५, रा. चौगुले प्लॉट, जळगाव) याच्याशी त्याचे जुने वाद होते. बुधवारी सकाळी सुद्धा त्यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास साई बोराडे हा गोलाणी मार्केट परिसरात आला असताना, संशयित आरोपी शुभमने त्याला गाठले. संतापलेल्या शुभमने जवळ असलेला चाकू काढून साईच्या शरीरावर उजव्या आणि डाव्या बाजूला गंभीर वार केले.
खाकी वर्दीतील देवदूत: हवालदार रमेश चौधरींचे धाडस..
ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रमेश बाबुलाल चौधरी हे वैयक्तिक कामासाठी मार्केटमध्ये आले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला आणि हातातील चाकूने हल्ला करणाऱ्या शुभमला पाहताच, चौधरी यांनी जीवाची पर्वा न करता हल्लेखोराच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी शुभमला जागीच पकडून प्रतिकार केला, ज्यामुळे साईवर होणारे पुढील वार थांबले आणि त्याचे प्राण वाचले.
पोलीस कारवाई आणि उपचार..
हवालदार चौधरी यांनी तात्काळ संशयित शुभम सोनवणे याला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी साई बोराडे याला नागरिकांच्या मदतीने प्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि त्यानंतर प्रकृती लक्षात घेता खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सागर शिंपी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली असून, साई बोराडे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भरदुपारी आणि गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मात्र, पोलीस हवालदार रमेश चौधरी यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एका तरुणाचे प्राण वाचल्याने पोलीस दलासह सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.








