जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात इच्छुकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याच धावपळीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या जागावाटपाचे आणि अधिकृत उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक प्रभागांत धक्कातंत्राचा अवलंब करत दिग्गजांचे पत्ते कट करण्यात आले असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

प्रभागनिहाय उमेदवारीचे चित्र खालीलप्रमाणे:
प्रभाग ११ व १२: प्रभाग ११ शिवसेनेच्या वाट्याला आला असून येथे डॉ. अमृता सोनवणे, संतोष पाटील, सिंधुताई कोल्हे आणि ललित कोल्हे निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग १२ भाजपकडे असून येथे अनिल अडकमोल, उज्वला बेंडाळे, गायत्री राणे आणि नितीन बरडे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.
प्रभाग ८ व ९: प्रभाग ८ मध्ये मानसी भोईटे, कविता पाटील आणि अमर जैन (भाजप) यांना संधी मिळाली आहे, तर एक जागा शिवसेनेसाठी सोडली आहे. प्रभाग ९ मध्ये संमिश्र चित्र असून मनोज चौधरी, प्रतिभा देशमुख (शिवसेना) तर जयश्री पाटील व डॉ. चंद्रशेखर पाटील (भाजप) उमेदवार असतील.
प्रभाग ७ व १०: प्रभाग ७ मधून दीपमाला काळे, अंकिता पाटील, विशाल भोळे आणि चंद्रशेखर अत्तरदे या भाजपच्या उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. प्रभाग १० मध्ये अतुल बारी, किरण भोई, सुरेश सोनवणे आणि जाकिर पठाण यांना भाजपने तिकीट दिले आहे.
प्रभाग १७ व १३: प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पूर्ण ताकदीनिशी उतरली असून हिना पिंजारी, सुमय्या पिंजारी, इकबालुद्दीन पिरजादे आणि प्रशांत नाईक ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार आहेत. प्रभाग १३ मध्ये भाजपने मोठे फेरबदल करत जितेंद्र मराठे व अंजना सोनवणे यांचा पत्ता कट केला असून नितीन सपके, सुरेखा तायडे, वैशाली पाटील यांना संधी दिली आहे, तर ‘ड’ मधून प्रफुल्ल देवकर (राष्ट्रवादी-अजित पवार गट) रिंगणात आहेत.
प्रभाग १५, १८ व १९: प्रभाग १५ मध्ये भाजपचे भगत बालानी, चेतन शिरसाळे, अरविंद देशमुख तर शिवसेनेच्या रेश्मा काळे उमेदवार आहेत. प्रभाग १८ पूर्णपणे शिवसेनेकडे असून डॉ. गौरव सोनवणे, नलुबाई सोनवणे, प्रतिभा भापसे निवडणूक लढवतील. प्रभाग १९ मध्ये रेखा पाटील, विक्रम सोनवणे, प्रतिभा देशमुख (शिवसेना) आणि राजेंद्र घुगे पाटील यांची नावे निश्चित झाली आहेत.
निष्ठावंतांचा संताप..
उमेदवारी जाहीर होताच भाजपमध्ये नाराजीचे नाट्य रंगले आहे. अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी दिल्याने कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रमुख आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिकीट कापल्या गेलेल्या नेत्यांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.








