जळगाव, (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून जळगावच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारी शहरातील हॉटेल प्रेसिडेंट येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.
विकासासाठी आणि विरोधकांना रोखण्यासाठी एकत्र: ना. गुलाबराव पाटील
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी रणशिंग फुंकले. “जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विरोधकांना नामोहरम करण्यासाठी भाजप-शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असा जागावाटपाचा फॉर्म्युला आम्ही निश्चित केला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हा फॉर्म्युला सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आला असून, लवकरच संयुक्त पत्रकार परिषदेत त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.
शिंदे गटाला २३ जागा? अजित पवार गटाचा पेच कायम
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या एकूण ७५ जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर उर्वरित जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करणार असल्याचे समजते. दरम्यान, महायुतीमधील तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) बाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून, त्यांना किती जागा मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शहरातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये झालेल्या या बैठकीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. किशोर पाटील, आ. अमोल पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, विष्णू भंगाळे आदी उपस्थित होते.
राजकीय समीकरणे बदलणार?
एकीकडे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात युतीचे संकेत मिळाल्यानंतर महायुतीने तातडीने हालचाली करत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. विरोधकांच्या ‘आघाडी’ला छेद देण्यासाठी भाजप-शिंदे गटाने कंबर कसली असून, आता जागावाटपाचा अधिकृत आकडा जाहीर झाल्यानंतरच जळगावच्या मैदानात खरी रणधुमाळी सुरू होईल.









