जळगाव, (प्रतिनिधी) : क्रेडिट कार्ड बंद करून नवीन कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकाची ४९ हजार ३८ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित कपिल पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन वेरांग्या पावरा (रा. दादावाडी, जळगाव) हे गणेश कॉलनी भागातील ‘दुसरे विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (साखर)’ कार्यालयात लेखापरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. २९ जानेवारी २०२४ रोजी ते कार्यालयात असताना कपिल पाटील नावाचा तरुण त्यांच्याकडे आला. त्याने पावरा यांचे जुने क्रेडिट कार्ड बंद करून नवीन कार्ड तयार करून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने पावरा यांच्याकडून आधार कार्ड आणि पॅन कार्डची प्रत घेतली.
मोबाईल क्रमांक बदलून साधला डाव..
संशयिताने पावरा यांच्या नावाने नवीन क्रेडिट कार्ड तर तयार केले, मात्र त्यावर स्वतःचा मोबाईल क्रमांक अपडेट केला. यामुळे कार्डवरून होणाऱ्या व्यवहारांचे मेसेज पावरा यांना मिळाले नाहीत. २९ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत संशयिताने वेळोवेळी कार्डचा वापर करून एकूण ४९ हजार ३८ रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहन पावरा यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. रविवारी (२२ डिसेंबर) ला याप्रकरणी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संशयित कपिल पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
अनोळखी व्यक्तीला कागदपत्रे देऊ नका!
कोणत्याही बँकेचा प्रतिनिधी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला आपले आधार, पॅन कार्ड किंवा ओटीपी (OTP) शेअर करू नका. फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.








