जळगाव, (प्रतिनिधी) : आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती स्पष्ट करत मोठी घोषणा केली आहे. या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी पक्षाने चाळीसगावचे धडाडीचे आमदार मंगेश चव्हाण यांची निवडणूक प्रभारी म्हणून, तर जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्त्यांमुळे जळगाव भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी यापूर्वी लोकसभा आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांच्याकडे असलेले नियोजनाचे कौशल्य आणि संघटन शक्ती लक्षात घेता, पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.
विजयाची परंपरा कायम राखण्याचे आव्हान..
दुसरीकडे, जळगाव शहरात नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमदार राजूमामा भोळे यांचा ‘करिश्मा’ पाहायला मिळाला. त्यांच्या नेतृत्वात भाजपने शहरात निर्विवाद वर्चस्व राखले आहे. त्यांच्या याच प्रभावी कार्यशैलीमुळे आणि कार्यकर्त्यांवरील पकडीमुळे आगामी महापालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आता भोळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
‘सर्वांना सोबत घेऊन आणि अथक परिश्रम करून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणे’ हेच आता या जोडीपुढील मुख्य उद्दिष्ट असणार आहे. या दोन दिग्गज नेत्यांच्या नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, येणाऱ्या काळात जळगावच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत.








