भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरातील जळगाव नाका परिसरात बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. पानाच्या टपरीवर लुटमार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना विरोध केला असता, त्यांनी ३९ वर्षीय तरुणावर थेट गोळी झाडली. या हल्ल्यात उल्हास गणेश पाटील (वय ३९) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जळगाव नाका परिसरातून खळवाडीकडे जाणाऱ्या पुलाच्या बाजूला स्वर्गीय नारायण पाटील व्यापारी संकुल आहे. या संकुलाजवळ असलेल्या पानाच्या टपरीवर बुधवारी रात्री चार अज्ञात तरुण आले. त्यांनी टपरीवर गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि गल्ल्यातील रोकड पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी टपरीवर असलेल्या उल्हास पाटील यांनी या प्रकाराला जोरदार विरोध केला. याच वादातून एका संशयिताने आपल्या कमरेतून बंदूक काढून उल्हास पाटील यांच्यावर गोळी झाडली. गोळी उजव्या खांद्याला लागल्याने पाटील खाली कोसळले. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली, दरम्यान चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी उल्हास पाटील यांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे हलवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. फॉरेन्सिक एक्सपर्टच्या पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत.
भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या गोळीबारामुळे जळगाव नाका परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. लुटमारीच्या उद्देशाने झालेला हा हल्ला आहे की यामागे काही जुना वाद आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.








